आयुष्यातील अविस्मरणीय क्षण
२० ऑक्टोबर ,२०१५ सकाळीच जाग आली . दर महिन्याच्या चेकअप साठी डॉक्टरकडे जायचंच होतं. पण , आजची सकाळ काही वेगळीच वाटत होती. वेगळाच थकवा जाणवत होता , सकाळ असूनही मरगळ वाटत होती. त्यातच अचानक पोटात दुखून आलं . आठवा महिना नुकताच संपलेला. तारीखही २१ नोव्हेंबर दिलेली. त्यामुळे असं पोटात दुखून येणं थोडं वेगळाच वाटत होत.
सर्व तयारी करून झाली आणि डॉक्टर कडे जायला निघण्या आधीच पोटात दुखून येऊन , काही समजण्याआधीच अंगावरून पाणी जाऊ लागलं. सर पहिलीच वेळ असल्यामुळे गोंधळ उडाला होता पुरता. आई ला हाक दिली तोच तिने लगबगीने रिक्षा बोलावून तसेच हॉस्पिटल गाठलं. नर्सेस आल्या आणि लगेच डॉक्टर्सना बोलावून घेतलं. यापूर्वीही एकदा मिसकॅरीज झालेलं असल्यामुळे मनात शंका कुशंका दाटून आल्या. त्यावेळेसही कॉम्प्लिकेशन्स असल्याचे आधीच आम्हाला कल्पना दिलीच होती. त्यात दिलेल्या वेळेच्या बऱ्याच आधी असं अचानक दुखणं आल्यामुळे मन पुरत भारावून गेले. त्यातून जवळ आई व्यतिरिक्त कुणीच नाही.
मनाचा गोंधळ आणि जीवाची घालमेल. दोन्ही बाजूनी सुटका होणं त्याघडीला महत्वाचा वाटत होत. डॉक्टर्स आले , तपासून झालं आणि म्हणाले सीझर केल्याशिवाय पर्याय नाही. अंगावरून पाणी असचं जात राहिलं , तर बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. लगेच काय तो निर्णय घ्या.
बाबा आले, बहीण आली. सर्व निर्णय घेणं बाबांनाही कठीण जात होत. सासरी कळवूनही कुणीच आले नव्हते. त्यावेळी माहेरची ओढ काय असते ते कळलं. नवऱ्याने सोबत असावे असे वाटणारे क्षण ,
नवरा दौऱ्यावर असताना माझ्या वाटी आलेले. कळवूनही तो आला नाहीच, वर तुमच्यावर विश्वास आहे काही निर्णय घ्या असं मिळालेलं उत्तर ….
यासर्वात मीच मग सीझर च्या सर्व फॉर्मॅलिटीएस करून सीझर करण्याची मानसिक व शारीरिक तयारी केली. भूल दिली खरी पण त्यादिवशी भूल हि मला भूल वाटली नाही. शरीर सुन्न होतं पण मन ??? मनाला फक्त वादळ माहित झालेले. बाळ कसं असेल इथपासून ते काही झाले तर ?? इथपर्यंत मनात वाहणारे वादळी वारे काही भलतेच अवघड होते सावरायला. डोळ्यातून पाणी अलगद बाहेर आले आणि तेवढ्यातच डॉक्टर म्हणाले काय मॅडम माहित आहे का काय झालं ???
मी तंद्रीतून बाहेर येऊन विचारते नाही तुम्हीच सांगा . डॉक्टर म्हणाले मुलगा झालाय आणि दोघंही सुखरूप आहात . बाळ सुखरूप आहे हेच मला कळलं होतं . मुलगा मुलगी याकडे लक्ष देण्याइतपत मला भानच कुठे होते म्हणा. पुन्हा डॉक्टर म्हणाले काय ग काय विचार करतेस? मुलगा झालाय आनंद नको का तुला ? मी हो म्हणाले आणि थकून तिथेच डोळे मिटून घेतले.
जाग आली तेव्हा वॉर्ड मध्ये होते आणि थोड्याच वेळाने त्यांनी माझ्या हाती बाळाला दिलं . त्या इवल्या हातांची बोटं माझ्या थकल्या हातांच्या बोटात गुंतून जणू मला अंतरातली जुळल्याची खूनच देत होते. मी आई झाल्याची अबोल भाषा त्या हातानी मला शिकवली असावी. ते मंद स्मित हसरे डोळे अजूनही तसेच आहेत. तेव्हापासून जे मी स्वप्नाली ची स्वप्नकविश झाले ते …. आज पर्यंत मला स्वतःची वेगळी ओळख राहिलीच नाही.
हा क्षणच अविस्मरणीय होता. जीवनाचे , नात्यांचे आणि अनुभवांचे सारेच रंग दाखवून गेलेला हा क्षण कुणी कसा विसरावा ???
- स्वप्नकविश (स्वप्नाली बाणे)
Swapnali Bane |
Comments
Post a Comment